वसई: मिरा भाईंदर शहरात सध्या पाणीटंचाई हा अतिशय चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तर, प्रत्येक वसाहतीत टँकर पुरवणाऱ्यांकडून होणारा पाणीपुरवठा पाहता, सामान्य नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होत नसताना, टँकर पुरवणाऱ्यांना पाणी कुठून मिळते? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

ठाणे जिल्ह्याचा भाग असणारे आणि मुंबईच्या नजीक वसलेले मिरा भाईंदर शहर हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडच्या काळात शहर चर्चेत येण्याचा मुद्दा म्हणजे शहरातील भीषण पाणीटंचाई. दररोज कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, महापालिकेकडून वारंवार घेतला जाणारा शटडाऊन आणि काही ठिकाणी तीन ते चार दिवसांच्या अंतराने येणारे पाणी यामुळे मिरा भाईंदरमधील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत.

तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरलेले सूर्या धरण योजनेचे २१८ दशलक्ष लिटर पाणी अजूनही शहराला मिळू शकलेले नाही. त्यामुळे शहरातील वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीसुद्धा आता मुद्दा उचलून धरला आहे. मात्र, असे असताना देखील शहरातील पाणीपुरवठ्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही.

नागरिकांना अजूनही पाण्यासाठी खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. टोलेजंग इमारती, लहान मोठ्या वस्त्या, चाळी सर्वत्र टँकरमधून पाणी पुरवले जात आहे. तर या टँकरचालकांकडून होणारा भरमसाठ पाणीपुरवठा पाहता, यांना नेमकं पाणी मिळतं कुठून? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेत काहींना हे पाणी दूषित असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी नागरिकांच्या हक्काचे पाणी टँकर माफियांना दिले जात असल्याचा आरोप केला आहे.