वसई: मिरा भाईंदरमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तर ऐन उन्हाळ्यात विस्कळीत झालेला शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून चक्क देवदेवता मिरा भाईंदरमध्ये अवतरल्याचे पाहायला मिळाले. मनसे पक्षाकडून शहरातील पाणीटंचाई विरोधात मंगळवारी अनोखे आंदोलन पुकारण्यात आले होते.
मिरा भाईंदर शहरात वारंवार जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खंडित केला जाणारा पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रखडलेला सूर्या धरण प्रकल्प यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मिरा भाईंदर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तर पाणीटंचाईविरोधात शहरातील राजकीय पक्ष आणि समाजसेवी संस्थाही आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मिरा भाईंदर मुख्यालयावर मनसे पक्षाने पाणीटंचाईविरोधात अनोखे आंदोलन पुकारले होते. यावेळी गणपती, श्रीराम, भगवान महादेव आणि पार्वतीचा वेश धारण केलेले काही कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते.
“गेल्या अनेक दिवसांपासून मिरा भाईंदर शहरातील सामान्य नागरिक सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेत चकरा मारत आहेत. पण, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज देवरूपी मानवांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया मिरा भाईंदर महिला शहराध्यक्ष कविता वायंगणकर यांनी दिली.
तर गेल्या आठ वर्षांपासून सूर्या प्रकल्पाच्या नावाने महापालिकेकडून नागरीकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना आता शहरात अनधिकृत झोपडपट्ट्या, लॉज आणि टँकर माफियांना सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने आधी या अनधिकृत पाणीपुरवठ्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मिरा भाईंदर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी दिली.
पाणीटंचाई विरोधात महिन्याभरात तिसरे आंदोलन:
मिरा भाईंदर शहरातील पाणीटंचाई ही फक्त आता नागरी समस्या न राहता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. महापालिका मुख्यालयात गेल्या महिन्याभरात काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि मंगळवारी मनसे अशा विविध पक्षांनी आंदोलन करत पालिकेच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
