भाईंदर : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणासाठी मिरा-भाईंदरमध्ये येत असल्याने संपूर्ण शहर त्यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, स्वागताच्या एक दिवस आधीच शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असा एकूण २२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर आहे.

मात्र, प्रत्यक्षात पाणीगळती आणि इतर कारणांमुळे शहराला सुमारे २०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाण्याचे वितरण वेळापत्रक आखण्यात आले असून, नियमित पुरवठा सुरू असताना नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही. परंतु पाणीपुरवठा बंद राहिल्यास टंचाईची समस्या तात्काळ जाणवते.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सोमवारीदेखील शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा झाला नसल्याचे समोर आले आहे. यात काशीनगर, इंद्रलोक, तलाव रोड, नवघर रोड, जेसल पार्क आणि मिरा रोड येथील काही भागांचा समावेश आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सतत जाणवणाऱ्या या पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या सूर्या प्रकल्प पाणीपुरवठा योजनेतील पाण्याची नागरिक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी शहरात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे अशा वेळी राजकीय नेते मोठमोठे फलक लावून स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. मात्र दुसरीकडे सामान्य नागरिकांना पाण्यासारखी मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाचे म्हणणे काय?

मिरा-भाईंदर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. एखाद्या वेळी जलवाहिनी फुटणे किंवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास पाणी उशिराने येते. दरम्यान, मिरा-भाईंदरला स्टेम आणि एमआयडीसीकडून शनिवारी १९८ दशलक्ष लिटर आणि रविवारी २०१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध झाला असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली आहे.