भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहराच्या पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य (एक्सपायर) रसायनाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या आरोपामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.यात शहरातील २८ स्वयंचलित क्लोरीन केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीसह सोडियम हायपोक्लोराइटच्या पुरवठ्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या निविदेला अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव होता.

यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते जय ठाकूर यांनी पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे सोडियम हायपोक्लोराइट हे रसायन २०२४ मध्येच मुदतबाह्य झाले असून, त्याचाच वापर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला. मुदतबाह्य रसायनामुळे पाणी निर्जंतुक होण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. या आरोपाची गंभीर दखल घेत स्थायी समितीचे सभापती हसमुख गहलोत यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित निविदा रद्द करणे, कंत्राटदाराचा करार रद्द करणे आणि दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

आरोग्याला धोका?

मुदतबाह्य क्लोरीन, ब्लीचिंग पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराइटसारखी रसायने कालांतराने प्रभाव गमावतात. त्यामुळे पाण्यातील जीवाणू व विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत. तसेच रासायनिक बदलांमुळे हानिकारक संयुगे तयार होऊन उलट्या, जुलाब, पोटदुखी, त्वचारोग आदी जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, असा दावा जय ठाकूर यांनी केला आहे.

पोलिसांना तक्रार :-

काँग्रेस गटनेते जय ठाकूर व माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यानी या प्रकरणी शहरातील जलकुंभ स्थळी भेती देऊन मुदतबाह्य कॅमेकल तपासले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्याबाबत चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.