भाईंदर : सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांदरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी कंत्राटदाराला पाच लाख तर सल्लागाराला एक लाख रुपये महापालिकेकडून दंड आकरण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरात सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहनी अंथरने, जल कुंभ उभारणे व इतर विविध कामे सुरू आहेत.

मात्र या कामाच्या गुणवत्तेत मोठी तडजोड केली जात असून सुरक्षे कडे देखील दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यावरून महापालिकेला या कामांच्या पाहणीत अनेक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. याबाबत संबंधित ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागारांना वारंवार तोंडी सूचना तसेच लेखी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झाल्या नाही.

त्यामुळे निविदेतील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार एल अँड टी इन्फ्रा इंडिया लिमिटेडवर पाच लाख रुपयांचा, तर कामावर देखरेख करणाऱ्या तांत्रिक सल्लागार मे. फॉरेस्टर इन्फ्राकॉन लिमिटेड यश इन्फोटेक सोल्युशन्स यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. भविष्यातही सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिक कठोर कारवाईचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला असल्याचे परिपत्रक काढून जाहीर केले आहे.

या सूचनांचे पालन करावे लागणार

-सर्व कामांच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करणे बंधनकारक.
-सुरक्षा जाळी आणि उंच संरक्षक पत्रे उभारण्याचे आदेश.
-सूचना फलक आणि पूरेसा उजेड करणे अनिवार्य.
-नागरिकांसाठी सुरक्षित प्रवेश व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक.
-प्रत्येक कामाच्या ठिकाणी जबाबदार अभियंता, पर्यवेक्षक आणि सुरक्षा अभियंत्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक.