भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात पावसाच्या हजेरीनंतर जागोजागी पाणी साचू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच चक्क तुंबलेल्या पाण्यात आंदोलनाला बसले.
मुंबईसह आसपासच्या उपनगरांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मिरा भाईंदर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करून प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली होती. मात्र शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. शहरातील ७५ सखल भागांसह मिरा रोडमधील यंदा नव्याने काही परिसरांमध्येही पाणी साचले.
दरम्यान, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असलेली नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नसल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपचे नगरसेवक विशाल पाटील, सचिन डोंगरे आणि करूना ताई हे साचलेल्या पाण्यातच आंदोलनाला बसले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात पाणी साचल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित अधिकारी आणि नालेसफाईच्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक आंदोलनाला बसल्याने प्रशासन नेमके कोणत्या दिशेने काम करत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
पाणी उपसणारे पंप बंद?
मिरा भाईंदर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये म्हणून प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पाणी उपसणारे पंप बसविले आहेत. मात्र पावसादरम्यान हे पंप बंद असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. तसेच शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असतानाही प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी दिसून येत नसल्याचा आरोप नागरिक समाजमाध्यमांवर करत आहेत.
