भाईंदर : मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदर शहरातील पाणी साचणे, वाहतूक कोंडी, सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा आणि नागरिकांची गैरसोय या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार मूलभूत सुविधांचा न झालेला विकास यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची लोकसंख्या सुमारे १५ लाख असून, एकूण ७९.४७ चौ.कि.मी. क्षेत्रापैकी अवघ्या २० ते २५ चौ.कि.मी. भागात ही लोकसंख्या दाटीवाटीने वास्तव्यास आहे. मुंबई महापालिकेला लागून असल्याने तसेच मुंबईच्या तुलनेत तुलनेने परवडणारी घरे उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक मिरा-भाईंदरमध्ये स्थायिक होत आहेत. परिणामी शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे.

मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे व नाले, तसेच रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास पुरेशा प्रमाणात झालेला नाही.हे शहर तीन बाजूंनी खाडीने वेढलेले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी आणि डोंगर उतारावरून येणारे पावसाचे पाणी यांचा निचरा करण्यासाठी सक्षम यंत्रणा आवश्यक असताना अनेक भागांत ती अपुरी पडत आहे.

मुसळधार पावसानंतर अनेक रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, सांडपाणी रस्त्यावर येणे आणि नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागणे, अशा घटना वारंवार घडत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत.मात्र त्यानुसार आवश्यक नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि निधीची उपलब्धता यांचे नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोपही होत आहे.

शहरातील वाढत्या नागरी समस्यांसाठी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दीर्घकालीन नियोजनावर भर देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा प्रत्येक पावसाळ्यात मिरा-भाईंदरकरांना याच समस्यांचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे.