भाईंदर :-मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या योग चळवळीला आता चांगलाच बहर आला आहे. शहरातील सुमारे ५ हजार नागरिक दररोज नित्यनियमाने योगाभ्यास करत असून, निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करत आहेत.संस्कार फाउंडेशन आणि युवा भारत पतंजली या संस्थांच्या पुढाकारातून सुमारे १२ वर्षांपूर्वी या योग चळवळीची सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी संतोष खटावकर यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे ही चळवळ शहरभर विस्तारली आहे.सध्या मिरा-भाईंदरमध्ये सुमारे २०० ठिकाणी योग केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये चार सत्रांमध्ये योग, व्यायाम, आसने, ध्यान आणि प्राणायाम यांचे प्रशिक्षण दिले जाते. उद्याने, सभागृहे तसेच मोकळ्या जागांमध्ये हे उपक्रम नियमितपणे पार पडतात.
या योग चळवळीत तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. याशिवाय पालिका शाळांतील विद्यार्थी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनाही मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यात या उपक्रमाचा मोठा वाटा असून, शहरात निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्यात ही योग चळवळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
