भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील जुन्या गावांमधील आगरी-कोळीवाडे तसेच आदिवासी पाड्यांमधील घरे संरक्षित करण्यासाठी शासनाकडून विशेष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. शासनाचे प्रधान सचिव, महसूल व महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबर रोजी हा दौरा होणार आहे. या पाहणीच्या आधारे अहवाल तयार करून जुन्या गावांमधील घरांच्या संरक्षणासाठी शासनाकडून नवीन धोरण निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.
भाईंदरच्या मुर्धा गावातील एका स्थानिक गावकऱ्याच्या अनधिकृत बांधकामावर नुकतीच पालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. या कारवाईवरून स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाला होता. सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली प्रशासनाने कारवाई केल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता.
जुन्या गावांमध्ये बांधकाम परवानग्यांसाठी असलेल्या नियमांमुळे गावकऱ्यांना घरांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करणे अडचणीचे ठरत असल्याचा मुद्दा सरनाईक यांनी उपस्थित केला. कुटुंबाचा विस्तार झाल्यानंतर घराची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असतानाही परवानग्यांच्या जाचक अटींमुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यामागे स्थानिक मराठी नागरिकांना हद्दपार करण्याचा कट असल्याचा आरोप देखील सरनाईक यांनी त्यावेळी केला होता.
त्यामुळे या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी सरनाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन जुन्या गावांमधील घरे संरक्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यावरून ३ सप्टेंबर रोजी प्रधान सचिवांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांचा विशेष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात मिरा भाईंदरमधील आगरी-कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांची पाहणी करण्यात येणार आहे. या भागातील जुन्या घरांचे संरक्षण, पुनर्बांधणी आणि बांधकाम परवानग्यांबाबतची अडचण दूर करण्याच्या दृष्टीने शासनाकडून नवीन धोरण तयार करण्यासाठी अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर नगरविकास विभागाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.
