भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये शिवसेना-भाजप मधील वादामुळे नव्याने उभारण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे कलादालन तांत्रिक अडचणीचे कारण देत उदघाटनापासून बंदच असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे.
भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट चौकाजवळ बाळासाहेब ठाकरे कलादालानाची उभारणी करण्यात आली आहे.शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या कलादालनाचे लोकार्पण मागील वर्षी करण्यात आले होते.यात अत्याधुनिक गेम झोन, विज्ञान केंद्र, नाट्यगृह आणि अभ्यासिकेची नागरीसाठी सोय करण्यात आली आहे.मात्र उद्घाटनापासूनच हे कला दालन बंद असल्याचे समोर आले आहे. कलादालनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘देखभाल कामासाठी बंद’ असा फलक लावण्यात आला आहे.
प्रामुख्याने कला जालनाच्या उद्घाटनानंतर मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या.यात महायुतीत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजप मधील स्थानिक पातळीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मधील वादामुळे फूट पडली आहे.त्यात निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळून शिवसेनेचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पालिकेची सूत्रे हाती येताच परिवहन मंत्री सरनाईक यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने भाजपकडून निर्णय घेतले जात आहेत.
या अंतर्गत कला दालनावर करण्यात आलेल्या अतिरिक्त खर्चबाबत देखील मेहता आरोप करत आहेत.यात कलादालनासाठी सुमारे १२८ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जात असताना, मूळ मंजूर किंमत सुमारे २२ कोटी रुपये होती. त्यानंतर खर्चात अनेक पटींनी वाढ झाली असून काही कामे निविदेशिवाय देण्यात आल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. त्यामुळे आता पालिका स्तरावर निर्णय होत नाही तोपर्यंत कला चालन बंद राहणार असल्याचे दिसून येत आहे.
म्हणून कलादालन बंद
या इमारतीचा ताबा अद्याप कंत्राटदाराकडून महापालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही. तसेच कंत्राटदाराला संपूर्ण देयक अदा झाले नसल्याने कलादालन बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय कलादालनाच्या संचालनासाठी आवश्यक धोरणालाही अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला असला, तरी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील भाडे व अनामत रक्कम निर्धारण समितीकडून निर्णय न झाल्याने संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे.तर समितीने निर्णय घेतल्यानंतर कला दालन खुले केले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.
दरमहा १५ लाखांचा खर्च
पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महासभेसमोर सादर केलेल्या अहवालानुसार, कलादालनाच्या दैनंदिन संचालनासाठी सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, व्यवस्थापन पथक, तिकीट कक्ष कर्मचारी आणि उद्यान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच मध्यवर्ती वातानुकूलन व्यवस्था, जनरेटर, सीसीटीव्ही, लिफ्ट तसेच विद्युत आणि नागरी देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. कोणतीही मोठी दुरुस्ती गृहीत न धरताही केवळ दैनंदिन संचालनासाठी दरमहा सुमारे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र संचालन धोरण आणि खर्चासंदर्भातील निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने हा प्रस्ताव अडकून पडला आहे.
या प्रकल्पावर आर्थिक अनियमिततेचे आरोपही झाले आहेत.
दरम्यान, अपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करून राजकीय श्रेय घेण्याचा प्रकार मिरा-भाईंदरमध्ये वाढत असल्याचीही चर्चा आहे. अलीकडेच भाईंदर पश्चिम येथील मिनी क्रीडा संकुलाचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र संचालन धोरण निश्चित न झाल्याने तेही उद्घाटनानंतर बंदच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक प्रकल्पांचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची टीका होत आहे.
कलादालन सुरू ठेवण्यासाठी दरमहा १५ लाखांचा खर्च
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महासभेसमोर सादर केलेल्या अहवालानुसार, कलादालनाच्या दैनंदिन संचालनासाठी सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, व्यवस्थापन पथक, तिकीट कक्ष कर्मचारी आणि उद्यान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच मध्यवर्ती वातानुकूलन व्यवस्था, जनरेटर, सीसीटीव्ही, लिफ्ट तसेच विद्युत आणि नागरी देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. कोणतीही मोठी दुरुस्ती गृहीत न धरताही केवळ दैनंदिन संचालनासाठी दरमहा सुमारे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र संचालन धोरण आणि खर्चासंदर्भातील निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने हा प्रस्ताव फाइलमध्येच अडकून पडला आहे.
