भाईंदर : मिरा-भाईंदरमधील कर्करोग रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शहरात स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हे काम रखडले असल्याचे समोर आले आहे.

मिरा-भाईंदरमध्ये स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी तत्कालीन आमदार गीता जैन यांनी केली होती. त्यावरून मिरा रोड येथील आरक्षण क्रमांक २१० (प्रसूतीगृह) आणि आरक्षण क्रमांक २११ (ग्रंथालय) ही दोन्ही आरक्षणे एकत्र करून त्या जागेवर कॅन्सर रुग्णालयासाठी आरक्षण करण्यात आले. याबाबतचा शासन आदेशही जारी करण्यात आला असून, या ठिकाणी अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या रुग्णालयामुळे मुंबईतील बोरिवलीपासून पालघर जिल्ह्यातील डहाणूपर्यंतच्या लाखो नागरिकांना त्यांच्या परिसरातच कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण उत्तर मुंबई आणि पालघर पट्ट्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.२०२३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, तीन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही. रुग्णालयाच्या इमारतीसाठी सुमारे १३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुरुवातीला या खर्चातील ७५ टक्के निधी राज्य शासनाने आणि २५ टक्के निधी महापालिकेने उचलण्याचे नियोजन होते.

मात्र, रुग्णालयाच्या बांधकामाबरोबरच त्याच्या संचालनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असल्याने महापालिकेने आर्थिक असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे बांधकामासह संपूर्ण निधी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नगरविकास विभागाकडे केली होती. यासाठी शासनाला पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याने प्रस्ताव शासन स्तरावरच रखडला आहे.दरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.