भाईंदर : मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. अनेक ठिकाणी कॅमेरे वाकणे, तुटणे, त्यांची दिशा बदलणे तसेच जोडणीच्या तारा तुटण्याच्या घटना घडत असल्याने पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.

मिरा-भाईंदर शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अधूनमधून जोरदार वारेही वाहत आहेत. या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर पालिकेने शहरभर उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही याचा फटका बसत आहे.
जोरदार वाऱ्याचा वेग सहन न झाल्याने काही ठिकाणी कॅमेरे वाकले किंवा तुटले आहेत.

अनेक ठिकाणी कॅमेऱ्यांची दिशा बदलली असून त्यामुळे देखरेखीवर परिणाम होत आहे. काही ठिकाणी कॅमेरे सुरक्षित असले तरी त्यांना जोडलेल्या वीज व डेटा केबल्स तुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सीसीटीव्ही यंत्रणेच्या उभारणीसाठी पालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस व वाऱ्याचा जोर कायम राहिल्यास आणखी आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मात्र अनेक कॅमेरे बंदच

मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी, विशेषतः भाईंदर पूर्व आणि मिरा रोड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या यंत्रणेला दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला असला तरी अनेक कॅमेरे अद्याप बंद अवस्थेत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे देखभालीअभावी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा आरोपही केला जात आहे.