भाईंदर:-मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेतल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने सोमवारी एका नामांकित खाजगी शाळेतील ११३ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक कामकाजासाठी लेखी आदेश व सूचना देऊनही संबंधित शिक्षक गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शहरातील ९५८ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी सुमारे ४ हजार ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांसह पालघर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी आणि शहरातील खाजगी शाळांतील शिक्षकांची निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली होती. याबाबतचे आदेशही महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आले होते.
नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहून, नेमून दिलेल्या ठिकाणी वेळेत रुजू होणे अपेक्षित होते. मात्र, मिरा रोड येथील एका खाजगी शाळेतील ११३ शिक्षकांनी प्रशिक्षण व प्रत्यक्ष कामकाजाकडे पाठ फिरवली, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे निवडणूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संबंधित शिक्षकांची गंभीर दखल घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये मिरा रोड पोलीस ठाण्यात ११३ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी मंगळवारी निवडणूक कामकाजात सहभाग घेतल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
