भाईंदर : दहिसर -मिरा भाईंदर मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र स्थानकाखाली खाजगी वाहने उभी करण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईला थेट जोडल्या गेलेल्या दहिसर–मिरा भाईंदर मेट्रोचा प्रवास बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. अद्याप दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असून काशिगाव ते सुभाषचंद्र बोस स्थानकापर्यंतचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवाशांना या मेट्रोने प्रवास करण्यासाठी काशिगाव स्थानकापर्यंत पोहोचावे लागत असून तेथून पुढे प्रवास करावा लागत आहे.
यासाठी अनेक प्रवासी लांबून रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन मेट्रो स्थानकापर्यंत येत आहेत. मात्र या स्थानकाखालील रस्ता प्रचंड रहदारीचा आहे. तसेच या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी कोणतीही सोय नाही. त्यामुळे सोबत आणलेली वाहने कुठे उभी करावीत,असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच आसपासच्या भागातदेखील कुठेही मोकळी जागा नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे स्थानक परिसरात किमान दुचाकी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
महापालिकेचा पुढाकार : मिरा भाईंदर शहरातील मेट्रो उड्डाण पुलाखालील परिसर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे. या ठिकाणी उद्यान व इतर सुविधांची उभारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र भविष्यात मेट्रोमधील प्रवासी संख्या आणि इतर वाहनांची संख्या लक्षात घेता या उड्डाण पुलाखाली वाहनतळ उभारण्याची मागणी स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी केली आहे.तसेच यासाठी नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहनतळ उभारण्यासाठी जवळपास दहा ते बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
