भाईंदर: मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर परिसरातील वर्सोवा गाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी सुमारे २३ झाडे कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील सार्वजनिक सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर शहरात महापालिकेमार्फत विविध विकासकामे हाती घेतली जात आहेत. अनेकदा आरक्षित भूखंडांवर बांधकाम करताना त्या ठिकाणी असलेली झाडे मुळासकट तोडली जातात किंवा काही प्रकरणांमध्ये त्यांचे पुनरोपण करण्याचे धोरण अवलंबले जाते.

घोडबंदर येथील वर्सोवा गावात प्रस्तावित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी बांधकाम विभागाने एकूण २३ झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर केला असून, त्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली आहे.

प्रस्तावित झाडांमध्ये गुलमोहर, आंबा, कडुलिंब, चिंच, वावळा आदी विविध प्रजातींचा समावेश आहे. संबंधित झाडे साधारणतः १३ ते ४८ वर्षे वयोगटातील असल्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात वन विभागाने २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली असून, नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.दरम्यान, पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

होळीच्या दिवशी झाडांची कत्तल

मिरा भाईंदर शहरात होळी च्या दिवशी अनेक ठिकाणी मोठी झाडे कापण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिका प्रशासनाने झाडे कापण्यावर सक्त मनाई केल्यानंतर देखील ही झाडे कापण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत पर्यावरण प्रेमीनी झाडे कापणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.