भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरात अतिवृष्टी तसेच समुद्रातील उंच लाटांचा धोका लक्षात घेऊन पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मागील चार दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
याशिवाय समुद्रात भरतीच्या वेळी साडेचार फूटांपर्यंत उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा तसेच काही खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असतानाही काही नागरिक सुट्टीचा फायदा घेत पर्यटनस्थळांवर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
मिरा-भाईंदर शहराला उत्तनसारखा समुद्रकिनारी परिसर लाभला असून येथे समुद्रकिनारे तसेच जंगल परिसर आहे. त्यामुळे अनेक पर्यटक दुचाकी व चारचाकी वाहनांसह येथे येत आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीत वेलंकणी, धारावी मंदिर, गोराई तसेच इतर पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
पोलीस कर्मचारी तैनात
पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच पर्यटनस्थळांच्या प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी पर्यटकांना घरी परतण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तसेच मद्यसेवन केलेल्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
