भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात उभारण्यात येणारे भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय रद्द करून त्या ठिकाणी महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. यासंदर्भात महासभेत ठरावही मंजूर करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला असून, या निर्णयाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोध दर्शवला आहे.
मिरा रोड येथील सेव्हन इलेव्हन शाळेजवळ असलेल्या महापालिकेच्या मैदानातील १५ टक्के जागेत भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सुमारे तीन वर्षांपूर्वी २७ सप्टेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संगीत विद्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या या संगीत विद्यालयाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता या ठिकाणी संगीत विद्यालयाऐवजी महापौर निवास उभारण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिली. त्यामुळे सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संगीत विद्यालयाचा निर्णय मागे घेऊन त्या ठिकाणी महापौर निवास उभारणे संतापजनक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात महापौर निवास असताना दुसरे महापौर निवास का उभारले जात आहे ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या आहेत.
