भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयासमोर व्यवसाय करणाऱ्या एका मराठी कुटुंबाला स्थानिकांनी घर देण्यास नकार दिल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महिलेने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही संबंधित महिलेच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे.

भाईंदर पश्चिम येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीमध्ये रेणुका शिंदे या महिला आपल्या कुटुंबीयांसोबत चहाचा व्यवसाय करतात. अवघ्या महिनाभरापूर्वीच हा व्यवसाय सुरू केल्यामुळे महिला, त्यांचे पती आणि लहान बाळ हे सध्या दुकानामध्येच राहत आहेत. मात्र जागेची अडचण भासू लागल्याने त्यांनी परिसरात भाड्याने घर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी स्थानिक दलालांशी संपर्क साधून घर शोधण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, जवळच असलेले एक घर त्यांना पसंत पडले. मात्र त्या इमारतीतील सोसायटी पदाधिकाऱ्यांनी मराठी असल्यामुळे घर देण्यास नकार दिल्याचे दलालाने महिलेला सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आपण मांस व मद्याचे सेवन करत नसून केवळ राहण्यासाठी घर हवे असल्याचे महिलेने संबंधितांना सांगितले. तरीदेखील मराठी व्यक्तींना घर देण्यास नकार असल्याची भूमिका घरमालकाने घेतल्याचे समोर आले आहे.या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलेने समाजमाध्यमांवर आपली व्यथा मांडली आहे. महिलेच्या या आरोपांमुळे मिरा-भाईंदर शहरात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चर्चेत आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलेच्या पाठीशी उभे राहत शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुकानावर जाऊन चहा पिणार असल्याचे जाहीर केले आहे. “राजकारण एकीकडे असले तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देण्यास नकार दिला जात असेल, तर उद्या त्याला मिरा-भाईंदरमधून हद्दपार करण्यासही वेळ लागणार नाही,”असा संताप सरनाईक यांनी व्यक्त केला. तसेच संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.