भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्गाखालील मुख्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा या रस्त्यांवरील अपघात अथवा जीवितहानीस एमएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधित मेट्रो कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापौर डिंपल मेहता यांनी दिला आहे.

मिरा-भाईंदर शहरातून जाणाऱ्या मेट्रो मार्गिका क्रमांक ९ चे काम सध्या सुरू आहे. दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा सुरू झाला असला, तरी काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदानदरम्यान मार्गिका आणि स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक ठिकाणी मुख्य रस्ता अडविण्यात आला असून बांधकाम साहित्यही रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या करारानुसार मेट्रोखालील रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर आहे.

मात्र, या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मागील चार महिन्यांत या मार्गावर २१ अपघात झाले असून त्यामध्ये सात जणांचा मृत्यू, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच मेट्रो कंत्राटदाराकडून सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचेही निदर्शनास आले. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात होणाऱ्या अपघातांना एमएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापौरांनी दिल्याची माहिती उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली.

तीन यंत्रणांना कारणे दाखवा नोटीस

मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गावर मागील चार महिन्यांत २१ अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत काशीमिरा वाहतूक पोलिसांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका, एमएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रस्त्यांच्या देखभाल व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात संबंधित यंत्रणांनी हलगर्जीपणा केल्यामुळे हे अपघात घडल्याचा ठपका या नोटिशीत ठेवण्यात आला आहे.