भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महासभेतील कामकाजाचे छायाचित्रण आणि चित्रिकरण करण्यास सर्वांनाच बंदी करण्यात आल्याने या विरोधात तक्रारदार एकवटले आहेत.

मिरा-भाईंदर शहरातील विविध प्रश्न, विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांवर महासभेत चर्चा केली जाते. त्यामुळे या सभेतील चर्चा आणि निर्णय नागरिकांना थेट पाहता यावेत, यासाठी महासभेचे प्रक्षेपण ऑनलाइन करण्याची मागणी करण्यात येत आहे.मागील अनेक वर्षांपासून महासभेचे छायाचित्रण आणि चित्रिकरण करण्यास कोणतीही बंदी नव्हती. मात्र, मागील तीन महासभांपासून सभागृहातील फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सर्वांनाच मनाई करण्यात आली आहे.महापौर डिंपल मेहता यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करत ही बंदी घातली आहे.त्यामुळे महासभेतील प्रत्यक्ष घडामोडी नागरिकांपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या काही तरुणांनी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना घरबसल्या महासभेचे कामकाज पाहता यावे आणि महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. आतापर्यंत सुमारे बाराशे तरुणांनी या मोहिमेत सहभाग नोंदविल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिकेच्या विविध सेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून नागरिकांना अनेक कामांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मग महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या महासभेचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे.स्वाक्षरी मोहिमेनंतर तक्रारदारांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या जनता दरबारात जाऊन महासभेचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी केली. तसेच पालिका प्रशासनाकडेही यासंदर्भात सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत.तर सभेचे प्रक्षेपण करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा मोठा खर्च आहे. त्यामुळे या बाबत निर्णय घेण्यासाठी महासभेत ठराव आणला जाणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून देण्यात आली आहे.