भाईंदर:- मिरा भाईंदर महापालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाला निधी उपलब्ध व्हावा आणि होणाऱ्या खर्चात देखील बचत व्हावी यासाठी महापालिकेची रोखे (बॉण्डस) जारी करावीत असा प्रस्ताव उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आयुक्तांना दिला आहे.त्यावरून प्रशासनाकडून यावर अभ्यास केला जात आहे.
मिरा भाईंदर महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. विकासकामांची देयके अदा करताना अडचणी येत असून निधीअभावी शहरातील काँक्रीट रस्त्यांची काही कामे थांबवावी लागली आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाला पर्याय शोधावे लागत आहेत. नव्या आर्थिक वर्षात कर आधार वाढवण्यासाठी मालमत्ता करदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्यातून अपेक्षित महसूल मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने रोखे जारी करून भांडवली निधी उभारावा, अशी भूमिका उपमहापौरांनी मांडली आहे. या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारता येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देता येईल. तसेच महापालिकेची आर्थिक विश्वासार्हताही बळकट होईल, असा दावा करण्यात आला आहे.
रोखे जारी करण्याचे संभाव्य फायदे :-
रोख्यांद्वारे उभारण्यात येणाऱ्या निधीवर द्यावे लागणारे व्याज हे पारंपरिक कर्जाच्या तुलनेत कमी असू शकते. त्यामुळे व्याजावरील खर्चात बचत होऊन आर्थिक ताण कमी होईल. दीर्घकालीन दृष्टीने हा पर्याय महापालिकेची आर्थिक स्थिती स्थिर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे उपमहापौरांनी नमूद केले आहे.
