भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत चित्रीकरणावरून झालेल्या वादानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत विकासकामांची आढावा बैठक घेतली. नागरिकांच्या हितासाठी सुरू असलेल्या बैठकीत लपवण्यासारखे काहीही नसल्याचे सांगत त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
मिरा भाईंदर महापालिकेच्या १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या महासभेत प्रेक्षक गॅलरीतून नागरिक चित्रीकरण करत असल्याच्या संशयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. महासभेच्या चित्रीकरणास बंदी असल्याचे सांगत महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाला परिस्थिती हाताळता आली नाही. त्यानंतर काही नगरसेवकांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन नागरिकांसह चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपच्या १६ नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नगरसेवक आणि महापालिकेच्या तक्रारीवरून नागरिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर महासभेच्या चित्रीकरणाचा मुद्दा चर्चेत आला असून, महापालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत शहरातील सुमारे २० विषयांवर चर्चा करण्यात आली. रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापालिका, पोलीस, महसूल विभाग, महामार्ग प्राधिकरण आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, सरनाईक यांनी पत्रकारांनाही बैठकीत उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. तसेच संपूर्ण बैठकीचे चित्रीकरण करण्यास मुभा दिली.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कॅमेरे बंद करून निर्णय घेण्याचा प्रयत्न होत असून, चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून नागरिक आणि पत्रकारांना मारहाण झाल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. मात्र, नागरिकांच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये लपवण्यासारखे काहीही नसते. त्यामुळे पारदर्शक कामकाजाचा संदेश देण्यासाठी पत्रकारांना बैठकीत सहभागी करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महासभेत चित्रीकरणावरून वाद निर्माण झालेला असतानाच परिवहन मंत्र्यांनी कॅमेऱ्यांसमोर बैठक घेतल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि सरनाईक यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
