भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडणार आहे.

महापालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर
लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन झाली आहे. महापौर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या निवड प्रक्रियेसाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ४ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत पिठासीन अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची नियुक्ती केल्याचे आदेश जारी केले आहेत. यावरून अर्ज दाखल करण्यासाठी २ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.सत्ताधारी भाजपकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी गटनेते हसमुख गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर काँग्रेस व शिवसेनेच्या संयुक्त ‘मिरा भाईंदर विकास आघाडी’ तर्फे अनिल सावंत यांनी अर्ज भरला आहे.महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपकडून अनिता पाटील, तर उपसभापती पदासाठी हेमा बेलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचा संख्याबळावर प्रभाव :

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यापैकी १३ सदस्य भाजपचे, तर ३ सदस्य मिरा भाईंदर विकास आघाडीचे आहेत.तसेच महिला व बालकल्याण समितीमध्ये एकूण ९ सदस्यांपैकी ७ भाजपचे, तर २ सदस्य आघाडीचे आहेत.या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापतीपदावर हसमुख गेहलोत यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने अनिता पाटील आणि हेमा बेलानी यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.