भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे तसेच धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व वाहने उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांसाठी ई-निविदा मागविली आहे. या कामासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांची अंदाजित तरतूद करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदर शहरात यावर्षी ४४ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. यापैकी आतापर्यंत पाच ते सहा इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामांवरही या निविदेच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे.महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत दोन लिफाफा पद्धतीने ई-टेंडरिंगद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक कंत्राटदारांना ५ ते २५ ऑगस्टदरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत ई-निविदा पत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येणार असून निविदा पत्रके किंवा निविदा पोस्टाद्वारे स्वीकारली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. निविदा शुल्क व इसारा रक्कम ऑनलाइन रिसीट प्रणालीद्वारे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, लिफाफा क्रमांक एकमधील तांत्रिक कागदपत्रांची हार्ड कॉपी निविदा भरल्यानंतर ७२ तासांच्या आत अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारतींवर कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

दंड वसलीकडे मात्र दुर्लक्ष

मिरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकावर कारवाई करत असताना महापालिका प्रशासनाला यंत्र सामुग्री, मनुष्यबळ व इतर गोष्टीवर मोठा खर्च येतो. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याकडून सदर खर्च वसुल करून घेण्याचा ठराव पालिकेत मंजूर करण्यात आला आहे. यासाठी निश्चित दंड आकरण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे.मात्र तरी देखील कारवाई नंतर सदर दंड वसुल करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष पणा करत असल्याचे दिसून आले आहे.