भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये जवळपास ३० टक्के जागा या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले होते. यावेळी दहिसरहून काशिगाव मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करताना त्यांच्यासोबत मिरा भाईंदरमधील स्थानिक नेते तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.
या दरम्यान एका विषयावर चौघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी मिरा भाईंदरमध्ये जवळपास ३० टक्के जागा आमदार नरेंद्र मेहता यांच्या असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. यावर, इतकी जागा असल्यास त्यातील १० टक्के जागा परिवहन मंत्र्यांना देणार असल्याचे मेहता यांनी विनोदी स्वरूपात नमूद केले.
हे संभाषण सुरू असतानाच समोर मोबाईल कॅमेरे सुरू असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी दोघांना शांत राहण्याचा सल्ला दिला. तसेच या गमतीशीर चर्चेला कॅमेऱ्यांमुळे वेगळे वळण लागू शकते, असे सांगत त्यांनी हा विषय थांबवला. मात्र या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
