वसई: मिरा-भाईंदर शहरात फॉर फ्युचर इंडिया व पार्ले वर्ल्डवाईड फाउंडेशन यांच्या माध्यमातून द ग्रीन कॅरी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या कपड्यांना अपसायकल करून त्यांच्यापासून कापडी पिशव्या तयार करण्यात येणार आहेत. या नव्या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच महिलांना रोजगारालाही नवी चालना मिळाली आहे.
प्लास्टिक पिशव्यांचे स्वस्त दर, टिकाऊपणा, सहज उपलब्धता तसेच सुलभ साठवणूक या गुणधर्मांमुळे अलीकडच्या काळात दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पण, प्लास्टिकच्या वाढत्या वापराचा पर्यावरणावर मात्र विपरीत होत आहे. यामुळे प्लास्टिक पिशव्यांना शाश्वत व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी फॉर फ्युचर इंडिया व पार्ले वर्ल्डवाईड फाउंडेशन या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
या संस्थांच्या माध्यमातून मिरा भाईंदर शहरात द ग्रीन कॅरी प्रकल्प राबविण्याग येत आहे. या उपक्रमाच्या नागरिकांकडून जुन्या व वापरात नसलेल्या कपड्यांचे संकलन केले जाणार आहे. त्यानंतर या कपड्यांची योग्य प्रकारे छाननी, स्वच्छता, धुलाई आणि प्रक्रिया करून या कपड्यांपासून टिकाऊ व पुनर्वापर करता येणाऱ्या कापडी पिशव्या तयार केल्या जातील. या पिशव्या दैनंदिन जीवनात वापरता येणार असून, त्याद्वारे एकेरी वापराच्या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात चार महिलांना चार शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या महिलांच्या माध्यमातून जुन्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार केल्या जाणार असून, त्यांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार व उत्पन्नाची संधी निर्माण होणार आहे. यामुळे हा प्रकल्प केवळ कापडी पिशव्या तयार करण्यापुरता मर्यादित नसून, कचऱ्याचे रूपांतर संधीमध्ये करण्याचा एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक प्रयत्न असल्याचे मत संस्थानी व्यक्त केले.
उपक्रमाचा मुख्य उद्देश:
जुन्या कपड्यांचा पुनर्वापर व अपसायकलिंग करणे.
कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देणे.
महिलांना रोजगार व उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे.
नागरिकांमध्ये पुनर्वापर, शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे.
सर्क्युलर इकॉनॉमी आणि शाश्वत विकासाचे स्थानिक मॉडेल उभे करणे.
