भाईंदर : पेणकरपाडा येथील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे तोडून त्यातील अॅल्युमिनियमच्या पट्ट्या चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला महापालिका कर्मचाऱ्याने स्थानिकांच्या मदतीने रंगेहात पकडले. रवी विश्वकर्मा असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेणकरपाडा येथील सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसाठी सक्शन मशीनची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महावीर नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ सक्शन मशीन पाठविण्यात आली. महापालिका कर्मचारी अमित कारके हे कामाची पाहणी करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी रवी विश्वकर्मा हा शौचालयाचे दोन दरवाजे तोडून त्यातील अॅल्युमिनियमच्या पट्ट्या काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.विश्वकर्मा याने अॅल्युमिनियमच्या पट्ट्या काढून त्या एका बॅगेत भरल्याचेही आढळून आले. प्रकार लक्षात येताच कारके यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला पकडले. विश्वकर्मा हा नायगाव येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
