भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या उमेदवारांच्या निवास व भोजनाची सोय मिरा रोड येथील मीनाताई ठाकरे मैदानात करण्यात आली आहे. त्यामुळे साक्षात ‘मां साहेब’च मदतीला आल्याची कुजबूज उमेदवारांमध्ये सुरू आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतरची ही दुसरी भरती प्रक्रिया आहे. त्यानुसार उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र भोसले मैदान येथे घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेत राज्यभरातून उमेदवार सहभागी होत असल्याने परीक्षेसाठी आलेल्या काही गरजू उमेदवारांची राहण्याची तसेच खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी, शारीरिक परीक्षा पूर्ण होईपर्यंत दोन-तीन दिवस हे उमेदवार मैदानाबाहेरील परिसरात उन्हातानात बस्तान मांडून बसलेले दिसतात. काही सामाजिक संस्थांकडून त्यांना अन्न पुरवले जात असले तरी राहण्याची समस्या कायम आहे.

दरम्यान, अशा उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी नुकत्याच पार पडलेल्या महापालिका महासभेत लोकप्रतिनिधींनी केली होती. यावरून महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांना दहा दिवसांपूर्वी याकडे लक्ष देण्यास सांगितले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी उमेदवार रस्त्यावर झोपत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

यासंदर्भात शिवसेना आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनात लक्ष वेधले होते. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उमेदवारांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. उमेदवारांच्या निवास व भोजनाची व्यवस्था मिरा रोड येथील मीनाताई ठाकरे सभागृहात करण्यात आली असून पुढील काही दिवस उमेदवारांना येथे निशुल्क राहता येणार आहे. येणारा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याची घोषणा त्यांनी समाजमाध्यमांद्वारे केली आहे.तर अडचणीच्या परिस्थितीत ‘मां साहेब’ मदतीला आल्याची चर्चा खेड्यापाड्यांतून आलेल्या उमेदवारांमध्ये होताना दिसत आहे.