Mira Bhayandar Police / भाईंदर :- मिरा रोड येथील एका महिलेच्या घरातून एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या तपासातून तेलंगणातील मोठे अमली पदार्थ उत्पादन रॅकेट उघडकीस आले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील जाहिराबाद येथे सुरू असलेला एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला असून या कारवाईत २० कोटी ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एका नव्या कारखान्यात प्रति दिवस २० कोटीचे अमली पदार्थ तयार केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
४ एप्रिल २०२६ रोजी नयानगर येथील छेडा आदर्श इमारतीमध्ये राहणाऱ्या फिरदोस अरबाज कुरेशी हिच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत २ कोटी ६६ लाख १७ हजार २८० रुपये किमतीचे १ किलो ३२४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी फिरदोस कुरेशी व तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्याविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा सखोल तपास करताना पोलिसांनी यापूर्वी १५ आरोपींना अटक केली होती. मिरारोड, आझाद मैदान, मालवणी आणि मनोर परिसरातून एमडी ड्रग्ज तसेच ते तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य असा सुमारे १३.६६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपी संदीप नायडू याला रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर नसीर उर्फ बाबा जामिनिया शेख आणि मेहमूद मेहबूब खान यांना हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जाहिराबाद तालुक्यात एका फार्महाऊसमध्ये एमडी तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. तेथून तीन किलो एमडी ड्रग्ज, तसेच क्लोरोफॉर्म, अॅसिटोन, मोनोमिथाईलअमाईन, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत नियंत्रित असलेले ‘२-ब्रोमो’ यांसह एकूण २,२९३ लिटर रसायन जप्त करण्यात आले. याशिवाय अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि उपकरणेही हस्तगत करण्यात आली. या कारवाईतील जप्त मालाची किंमत ६.३२ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २०.९७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून तपास सुरू आहे.सदर कारवाई ही उपायुक्त संदीप ढोईफोडे यांच्या निदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ व गुन्हे शाखे ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून रसायनाचा पुरवठा
एमडी निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा पुरवठा आणि आर्थिक व्यवहारांची साखळी विविध राज्यातून होत असल्याचे तपासात समोर येत आहे. विविध राज्यांमध्ये पसरलेल्या या जाळ्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासले जात असून कच्चा माल आयात करण्यासाठी वापरण्यात आलेली बँक खाती आणि व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली आहे.
