भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात साचलेल्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, यासाठी नाल्याच्या फटीत अडकलेला गाळ स्वतः काठीच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महापालिकेने हा व्हिडीओ आपल्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुपारच्या सुमारास समुद्रातील भरतीमुळे पाण्याचा निचरा मंदावल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध भागांची पाहणी सुरू ठेवली आहे.
पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ किंवा अडथळे आढळत आहेत, तेथे तातडीने कंत्राटदारांकडून साफसफाई करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच रस्त्यावरील पाणी नाल्यात जात नसलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
मिरा रोड परिसरातील एका ठिकाणी नाल्याच्या फटीत गाळ अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी काठीच्या साहाय्याने फट मोकळी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनीही तातडीने अडथळा दूर करून पाण्याचा प्रवाह सुरळीत केला.या घटनेचा व्हिडीओ महापालिकेने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला असून काही नागरिकांनी आयुक्तांच्या तत्परतेचे आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. मात्र दुसरीकडे, नालेसफाईची कामे वेळेत आणि प्रभावीपणे झाली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी टीकाही काही नागरिकांकडून समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे.
