भाईंदर : मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या बंद कंटेनर शाखेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरून हटवून शहरातील एका कोपऱ्यात ठेवण्यात आलेल्या कंटेनरमध्ये तरुण जोडप्याचे कथित अश्लील कृत्य सुरू असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.
मिरा भाईंदर शहरात मागील दोन वर्षात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर कंटेनरच्या स्वरूपात पक्षाच्या शाखा उभारण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेने कारवाई केल्यानंतर या शाखा संबंधित ठिकाणांहून हटविण्यात आल्या.त्यापैकी दोन कंटेनर भाईंदर पूर्वेतील आरएनपी पार्क परिसरातील सोनल पार्क येथे एका खासगी जागेत ठेवण्यात आले होते. मागील काही महिन्यांपासून हे कंटेनर बंद अवस्थेत होते.
या दोन कंटेनरपैकी एका कंटेनरचा मंडप सजावटीच्या व्यवसायासाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. तर शेजारील दुसऱ्या कंटेनरमध्ये एका तरुण जोडप्याचे कथित अश्लील कृत्य सुरू असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या शाखेसाठी वापरण्यात येणाऱ्या कंटेनरचा गैरवापर होत असल्याचा आरोप भाजप नगरसेवक तरुण शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, याच कंटेनरजवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र जळालेल्या अवस्थेत आढळल्याचे दिसून आले आहे. हे छायाचित्र कोणी जाळले, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
खासगी जागेच्या मालकाकडून गैरवापर झाल्याची तक्रार : राजू भोईर
संबंधित कंटेनरचा पूर्वी शिवसेनेची शाखा म्हणून वापर करण्यात येत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी हे कंटेनर रस्त्यावरून हटवून एका खासगी जागेत कुंपणाच्या आत ठेवण्यात आले होते. त्या जागेच्या मालकाने कंटेनरचा गैरवापर केल्याची तक्रार प्राप्त झाली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत. शिवसेना हा नागरिकांच्या सेवेसाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणी आरोप करत असेल, तर शिवसेनेचे कार्य नागरिकांना नव्याने सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख राजू भोईर यांनी दिली.
