भाईंदर : मिरा भाईंदर शहरात महापालिकेने निश्चित केलेल्या फीडिंग केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मोकाट श्वानांना खाद्य दिल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या निर्णयाला विरोध वाढल्यानंतर सत्ताधारी भाजपने घूमजाव करण्याचे संकेत दिले आहेत. शहरातील रस्ते आणि पदपथ वगळता अन्य ठिकाणी श्वानांना खाद्य देण्यास परवानगी देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रमुख नेते आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले.
मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत काही दिवसांपूर्वी निश्चित केलेल्या फीडिंग केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मोकाट श्वान, मांजर किंवा इतर प्राण्यांना खाद्य दिल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव सत्ताधारी भाजप कडून मंजूर करण्यात आला होता. या निर्णयामुळे प्राणीप्रेमी आणि प्राणिमित्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारीही सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर मेहता यांनी समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या व्हिडीओद्वारे भूमिका स्पष्ट केली. आपण जीवदया मानणारे असून कोणत्याही प्राण्यांना खाद्य देण्यास विरोध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. महापालिकेने निश्चित केलेल्या २९ फीडिंग केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्राणीप्रेमींनी योग्य जागा सुचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
फीडिंग केंद्रांची संख्या आणि ठिकाणे वाढवल्यानंतरच दंडात्मक कारवाईबाबत पुढील पाऊल उचलण्यात येईल. सध्या दंडात्मक कारवाईसाठी प्रशासनाने कोणतीही कार्यपद्धती निश्चित केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे विनंती करून बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
