भाईंदर :– मिरा भाईंदर शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या सूर्या पाणीपुरवठा योजनेतील वीज मनोरे उभारण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरही स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. मात्र, पालघर जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही अडचण दूर झाली असून, आगामी काही महिन्यांत शहराला सूर्या योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिरा भाईंदर शहराला सध्या स्टेम आणि एमआयडीसीकडून दररोज २११ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे हा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने शहराला वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शहराला अतिरिक्त २१८ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेची बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी आवश्यक वीजपुरवठ्याअभावी शहराला अद्याप पाणी मिळू शकलेले नाही.

सूर्या योजनेच्या पालघर येथील पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून १६६ विद्युत मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यापैकी सात मनोरे कांदळवन आणि सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने न्यायालयाच्या परवानगीअभावी काम रखडले होते. महापालिकेने न्यायालयात शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती मांडल्यानंतर उच्च न्यायालयाने मनोरे उभारण्यास परवानगी दिली होती.

मात्र, ही परवानगी मिळाल्यानंतरही खासगी जमिनींवर विद्युत मनोरे उभारण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने काम पुन्हा रखडले. त्यामुळे सूर्या योजनेचे पाणी शहरात आणखी किती काळाने पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

महापालिकेनेच घेतला पुढाकार

ही अडचण दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्याशी संपर्क साधला. शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर विद्युत मनोरे उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी दिली.

लवकरच काहीसे पाणी मिळणार

वीज मनोरे आणि संबंधित वीजपुरवठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सूर्या योजनेतून मिरा भाईंदरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, तोपर्यंत वसई विरारसाठी उपलब्ध असलेल्या वीजपुरवठ्याच्या आधारे मिरा भाईंदरला पहिल्या टप्प्यात दररोज १० ते २० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केला जाणार आहे.