भाईंदर : उत्तन-पाळी येथील कचऱ्यावर तीन महिन्यांत बायोमायनींग प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका अर्ज दाखल करणार आहे. उर्वरित कचऱ्यावर बायोमायनींग पूर्ण करण्यासाठी आवश्यक कालावधी देण्यात यावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
उत्तन येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे ९ लाख ६६ हजार मेट्रिक टन जुना कचरा साचला होता. त्यापैकी गेल्या वर्षभरात सुमारे ४ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनींग प्रक्रिया करण्यात आली असून, सुमारे ३ लाख मेट्रिक टन कचरा पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे. उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. या कचऱ्यावर बायोमायनींग करण्यासाठी महापालिकेने तीन कंपन्यांची निवड केली आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे.
मात्र, पावसाळ्यात सुमारे चार महिने बायोमायनींगचे काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळा संपला असून शासनाकडून आवश्यक निर्देश मिळताच बायोमायनींगचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्याचे प्रमाण आणि प्रत्यक्ष कामाची क्षमता लक्षात घेता तीन महिन्यांची मुदत अपुरी आहे. त्यामुळे बायोमायनींग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कामाला लागणारा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी महापालिका पुनर्विचार अर्जातून करणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.
निर्देश मिळताच काम सुरू
पावसाळ्यामुळे बायोमायनींगचे काम काही काळ बंद ठेवण्यात आले होते. आता पावसाळा संपला असून शासनाकडून निर्देश मिळताच काम पुन्हा सुरू करण्यात येईल. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात कचऱ्यावर प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कालावधी मिळावा, अशी महापालिकेची भूमिका आहे, अशी माहिती आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.
