भाईंदर :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर ९२१ नवे कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यामुळे आयुक्तालयातील मनुष्यबळाची कमतरता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन जवळपास सहा वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे येथील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यानुसार आयुक्तालयातील दुसरी भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. यामध्ये ९२१ पदांपैकी ८४० पदे पोलीस शिपाई तर ८१ पदे वाहनचालकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. या पदांसाठी सुमारे ५७ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले होते. अर्जदारांमध्ये उच्चशिक्षित तरुण-तरुणींचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. उमेदवारांची शारीरिक चाचणी भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर घेण्यात आली होती.
अखेर या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या ९२१ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी नागपूर किंवा अकोला येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठविण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची विविध पोलीस ठाणे व विभागांमध्ये नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
