भाईंदर : मिरा-भाईंदरमधील तीव्र पाणीटंचाईचा फटका आता शाळा आणि उद्योगांनाही बसू लागला आहे. पाण्याअभावी भाईंदर येथील तपोवन विद्यालयाने शुक्रवारी विद्यार्थ्यांना सुट्टी दिल्याची बाब समोर आली आहे. तर शहरातील अनेक भागांमध्ये तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

पावसाच्या विलंबामुळे मिरा-भाईंदर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सुमारे ४० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, या पाणीटंचाईची झळ आता खासगी शाळा आणि औद्योगिक क्षेत्रालाही बसू लागली आहे.भाईंदर येथील तपोवन विद्यालयात गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शौचालयांसह इतर मूलभूत सुविधांवर परिणाम झाला. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा प्रशासनाने शुक्रवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर शाळेचे कामकाज पुन्हा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाणीटंचाईचा परिणाम केवळ शाळांपुरता मर्यादित नसून औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फटका बसत आहे. अनेक उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. तसेच वाहन धुलाई केंद्रांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन तरण तलाव, मोठी बांधकामे, औद्योगिक आस्थापना आणि वाहन धुलाई केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी बोअरवेल, टँकर किंवा पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करण्याचेही त्यांनी सुचविले आहे.शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्ववत आणि सुरळीत झाल्यानंतर ही समस्या मार्गी लागेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.