भाईंदर :- दिवाळीनिमित्त नियोजित पाणीकपात स्थगित करण्यात आली असतानाही मिरा भाईंदर शहरातील अनेक भागांत दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. सोमवारी २ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर मंगळवारी सकाळीही अनेक भागांत नळ कोरडेच राहिल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी २ आणि ९ नोव्हेंबर रोजी नियोजित पाणीपुरवठा बंदी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पाणीकपात स्थगित केल्यानंतरही सोमवारी अनेक भागांत पाणी आले नाही. मंगळवारी सकाळीही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.
याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, भिवंडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. जलवाहिनीची काही तासांत दुरुस्ती करून मिरा भाईंदरसाठीचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उशीर झाला असला तरी आता शहराला पाणी मिळेल, असा दावा पाटील यांनी केला.
दरम्यान, शहरात आधीच पाणीटंचाईची समस्या असताना दिवाळीतही पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाणीकपात स्थगित केल्याची घोषणा आणि प्रत्यक्षातील पाणीपुरवठा यामध्ये तफावत असल्याने महापालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
