भाईंदर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘मी पृथ्वीसाठी काय करणार?’ या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना स्वच्छता, पाण्याचा जपून वापर, वीज बचत, कापडी पिशव्यांचा वापर तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दरवर्षी ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त मिरा-भाईंदर शहरातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने महापालिका प्रशासनाकडून कोणताही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. मात्र, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते भाईंदर येथील ठाकरे मैदानाजवळील आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आले.

याशिवाय, यंदा महापालिकेने पर्यावरण दिनानिमित्त डिजिटल जनजागृती मोहिमेवर भर दिला आहे. ‘मी पृथ्वीसाठी काय करणार?’ या शीर्षकाखाली नागरिकांनी दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, यासाठी विविध संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. स्वच्छता राखणे, पाण्याची बचत करणे, वीजेचा जबाबदारीने वापर करणे, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे यासारख्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला आहे.

दरम्यान, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या गृहसंकुलांचा, संस्थांचा आणि सामाजिक संघटनांचा आगामी काळात विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.