भाईंदर : मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड येथे अखेर शांततेत बकरी ईद साजरी करण्यात आली. यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
मिरा रोड परिसरात मुस्लिम नागरिकांची संख्या मोठी असल्याने बकरी ईदनिमित्त विविध ठिकाणी तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुनम क्लस्टर या गृहसंकुलात काही मुस्लिम बांधवांनी बकरे आणल्यानंतर त्यावर संकुलातील काही रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेतल्याने प्रकरणाला धार्मिक वळण लागले होते.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष बकरी ईदच्या दिवशी शहरात शांततेचे वातावरण कायम राहिल्याचे दिसून आले.
मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध मशिदींमध्ये टप्प्याटप्प्याने जाऊन नमाज अदा केली. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या मैदानांमध्ये आणि खासगी जागांवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यांमध्ये कुर्बानीची प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, शहरात मुस्लिम नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत बकरी ईद शांततेत साजरी केली. शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली.
