भाईंदर :– मिरारोड येथील सहकारी संस्थेच्या पुनर्लेखा परीक्षण अहवालासाठी लाच मागणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील चौकशी अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या संदर्भात मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिरा भाईंदर शहरात आवश्यक सरकारी कामे, नोंदी पूर्ण करून देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी लाच मागितली असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मिरारोड येथील उपनिबंधक कार्यालयातून समोर आली आहे. अविनाश बबन मोहिते (४३) असे आरोपीचे नाव आहे. ते सनदी लेखापाल तथा चौकशी अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात कार्यरत आहेत.
तक्रारदार मिरारोड पूर्व येथील रामदेव पार्क परिसरातील रहिवासी असून, त्यांच्या सोसायटीचे सन २०२१-२२ या वर्षाचे पुनर्लेखा परीक्षण करून अहवाल देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला ६ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर साडेतीन लाख रुपयांवर व्यवहार ठरला होता. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले होते.
या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार २९ जानेवारी रोजी मिरारोड पूर्व येथील चंद्रेश एकार्ड इमारतीजवळ सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी अविनाश मोहिते यांनी तक्रारदाराकडून १ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच दुपारी १ वाजता पंचांसमक्ष त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय कावळे आणि पोलीस निरीक्षक सुनील कारोटे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

