भाईंदर : सोमवारी पहाटेच्या सुमारास काशीमीरा येथील मिरा गावठाण परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या बैठ्या चाळीवरील घराच्या पत्र्यावर आदळल्याची घटना घडली आहार. यात घरात असलेले चार जण जखमी झाले आहेत.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यादरम्यान ही घटना घडली. ‘विघ्नहर्ता’ या निर्माण आधीन इमारतीच्यावरच्या मजल्यावर ठेवण्यात आलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक अचानक खाली पडला. हा ब्लॉक थेट लगतच्या श्री हरिधाम वेल्फेअर सोसायटीमधील बैठ्या चाळीच्या पत्र्याच्या छताला फोडून घरात घुसला. त्यावेळी घरातील सदस्य घरात असल्याने त्यांना दुखापत झाली.

या दुर्घटनेत प्रियंका सतीश चौबे, सतीश चौबे, धर्मेंद्र सोनी आणि संतोष जाधव हे जखमी झाले आहेत. त्यापैकी प्रियंका चौबे यांच्यावर ऑर्बिट रुग्णालयात, तर अन्य तिघांवर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वर ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य खाली पडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विकासकावर कारवाईची मागणी

मिरा भाईंदर शहरात अनेक मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे या उंच इमारतींवर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे आरोप करत संबंधित विकासक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची महापालिका आयुक्तानी देखील दखल घेतली असून घटनास्थळी पालिका अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.