भाईंदर : मिरा रोड येथे झालेल्या क्रेन दुर्घटनेत जे. पी. इन्फ्रा या विकासकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या वडिलांनी मागील तीन दिवसांपासून काशिगाव पोलीस ठाण्याबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मिरा रोड येथील जे. के. एरिस इमारतीच्या प्रांगणात १६ जुलै रोजी शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील उंच क्रेन कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत मोहम्मद मुज्जमिल खोकर (२१) या तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना विकासकाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप करत संबंधित जे. पी. इन्फ्रा या संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती.
मात्र, या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यामुळे जवळपास दोन दिवस कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी काम करणाऱ्या कंत्राटदार आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, संबंधित विकासकाला या प्रकरणात आरोपी करण्यात आले नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यामुळे विकासकावरही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतकाचे वडील मागील तीन दिवसांपासून काशिगाव पोलीस ठाण्याबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत. “जोपर्यंत विकासकाविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार,”अशी भूमिका खोकर यांनी जाहीर केली आहे.दरम्यान, या प्रकरणी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील चौकशीनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
