भाईंदर : मिरा रोड येथील रहिवासी गृहसंकुलावर क्रेन कोसळण्याच्या अवघ्या काही क्षणांपूर्वीच त्या ठिकाणी ३० हून अधिक रहिवासी उपस्थित होते. मंदिरातील आरती आटोपल्यानंतर बहुतांश नागरिक घरी परतले आणि काही मिनिटांतच क्रेन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे संपूर्ण इमारतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिरा रोड येथील जेके आयरिस इमारतीच्या प्रांगणात शेजारील बांधकामस्थळावरील क्रेन कोसळल्याने मोहम्मद मुज्जमिल खोकर (२१) याचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली आहे. बांधकामस्थळावरील निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत असून, संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असतानाच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोजप्रमाणे इमारतीच्या प्रांगणातील हनुमान मंदिरात सायंकाळची आरती झाली होती. त्यावेळी ३० हून अधिक रहिवासी मंदिर परिसरात जमले होते. आरती संपल्यानंतर बहुतांश नागरिक घरी परतले. मात्र, प्रांगणात वारा असल्याने मुज्जमिलसह काही जण तेथे येऊन थांबले.त्याच वेळी अचानक क्रेन कोसळली आणि ही दुर्घटना घडली.

‘आम्ही काही मिनिटांपूर्वीच त्या ठिकाणाहून निघालो, त्यामुळे आमचा जीव वाचला,’अशी भावना अनेक रहिवाशांनी व्यक्त केली. रहिवाशांनी असा आरोप केला की, संबंधित बांधकामस्थळाविषयी यापूर्वीही तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींकडे विकासकाने दुर्लक्ष केल्याने अखेर ही गंभीर दुर्घटना घडली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.