भाईंदर :- अभ्यास करताना चूक केल्याच्या कारणावरून एका पित्याने आपल्या मुलाला चटके देऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना मिरारोड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिव्यांश शर्मा असे जखमी मुलाचे नाव असून तो दीपक हॉस्पिटल परिसरात आपल्या वडील धीरज शर्मा यांच्यासोबत राहतो.
पिता-पुत्र एकत्र राहत असल्याने दिव्यांशची जबाबदारी वडिलांवर होती. मात्र काही दिवसांपूर्वी धीरज यांनी मुलाला गंभीर मारहाण करून भाजल्याचा आरोप दिव्यांशच्या आईची आई मिनू शर्मा यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमांवर एक चित्रफीत तसेच दिव्यांशचा फोटो पोस्ट केला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वीही धीरजने आपल्या मुलीला देखील त्रास दिल्याचा आरोप त्यांनी यात केला आहे.संबंधित प्रकरणात धीरज तुरुंगवास भोगून आल्यानंतरही कुटुंबीयांना त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिव्यांश देखील कॅमेऱ्यासमोर आला असून त्याने वडिलांकडून होणाऱ्या अमानुष मारहाणीची कबुली दिली आहे. अभ्यास करताना थोडीशी चूक झाली तरी वडील काठीने मारहाण करतात किंवा इस्त्री गरम करून चटके देत असल्याचा आरोप त्याने केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

