भाईंदर : मिरारोड येथील सृष्टी भागात महापालिकेने नव्यानेच उभारलेल्या पदपथाची तोडफोड करून त्याची रुंदी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाकडून मोठे आर्थिक नुकसान केले जात असल्याची तक्रार केली जात आहे.

मिरारोड येथे सृष्टी हा उचभ्रू गृहसंकुल असलेला परिसर आहे. महापालिकेने गेल्या काही वर्षात या भागात पदपथ,पथदिवे, सिमेंट रस्ते, वृक्ष लागवड आणि इतर आवश्यक गोष्टीची उभारणी करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे या भागात नागरिकांची सतत रहादारी दिसून येत असते.मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील पदपथाची रुंदी करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. यासाठी अवघ्या वर्षभरापूर्वीच उभारलेल्या पदपथाची तोडफोड करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला.

प्रामुख्याने या मार्गांवर वेगाने वाहने धावत असतात. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक पदपथाचा वापर करतात. मात्र आता हे पदपथ तोडून त्याची रुंदी कमी करण्यात आल्यामुळे एक पेक्षा अधिक जणांना त्यावरून प्रवास करणे कठीण होत आहे. शिवाय चांगल्या मार्गाची तोडफोड करण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला. याबाबत माजी नगरसेवक अनिल सावंत यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिली आहे. तर त्या भागात रस्त्याचे रुंदीकरण करून पुन्हा पदपथ पूर्ववत केले जाणार असल्याचा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.

पदपथावर अतिक्रमण :

मिरारोड येथे सृष्टी परिसरासह अन्य ठिकाणी देखील नागरिकांकडून पदपथाचा वापर करण्याकडे प्राधान्य दिले जात आहे. मात्र बहुतांश भागात या पदपथावर फेरीवाले, दुकानचालक आणि हॉटेल व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक लागून एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तर याकडे महापालिका प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

पदपथांवरील बांधकाम साहित्यामुळे अडथळा :

मिरारोडच्या परिसरात वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात अनेक नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांकडून साहित्य थेट पदपथांवर तसेच रस्त्यावर ठेवले जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

यापूर्वीच महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना रस्त्यावर तसेच पदपथांवर साहित्य न ठेवण्याचे सक्त आदेश दिले होते. तसेच या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकही स्थापन करण्यात आले होते. तरीदेखील शहरातील अनेक भागांमध्ये माती, रेती, सळ्या आणि ब्लॉक्स यांसारखे बांधकाम साहित्य सर्रास रस्त्याच्या कडेला ठेवले जात असल्याचे दिसून येतात.