भाईंदर :- मिरा रोड येथील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या गडप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा भाईंदर शहरात ऐतिहासिक असा घोडबंदर किल्ला आहे. हा किल्ला पुरातत्त्व विभागाकडे नोंदणीकृत आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड होत होती. त्यामुळे महापालिकेने राज्य शासनाकडे घोडबंदर किल्ला ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजने’ अंतर्गत संवर्धनासाठी देण्याची मागणी केली होती. शासनाने यास मंजुरी देत २१ जून २०१९ रोजी महापालिकेसोबत पाच वर्षांचा करार केला. त्यानंतर किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून पुरातत्त्व विभागाच्या मदतीने संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले.
सध्या किल्ल्याच्या बांधकामाचे काम पूर्ण झाले असून अवतीभवतीचा परिसर विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे किल्ल्याला मिळालेले नवे स्वरूप पाहण्यासाठी गडप्रेमी आसपासच्या भागातून येथे येत आहेत. नुकतेच प्रशासनाने किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा केला होता. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून किल्ल्यावर पूर्णतः अंधार पसरला आहे.
प्रशासनाने येथे लावलेले मोठे दिवे आणि हायमास्ट दिवे बंद ठेवले आहेत. इतकेच नव्हे तर किल्ल्याच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले दिवेदेखील बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर घोडबंदर किल्ल्यावर तात्काळ प्रकाशव्यवस्था सुरू करण्याची मागणी गडप्रेमींनी केली असून त्यांनी महापालिकेला लेखी तक्रारही दिली आहे.दरम्यान, किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून पूर्ण झाल्यानंतर दिवे सुरू करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
