भाईंदर : मिरा रोड येथील रुग्णालयांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.याबाबत समितीने विविध खासगी रुग्णालय प्रशासनाला भेट देऊन याबाबतचे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांची मातृभाषा मराठी असल्याने रुग्णालयातील मुख्य फलक, सूचना पाट्या, मार्गदर्शक माहिती तसेच विविध विभागांची नावे प्रामुख्याने मराठीत असावीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या अनेक सूचना इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये असल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत योग्य विभाग शोधण्यात विलंब होऊन रुग्णांची गैरसोय होत असल्याचेही निदर्शनास आणले आहे.त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने आवश्यक बदल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सूचना काय?

रुग्णालयाच्या मुख्य पाट्या ठळक व स्पष्ट मराठीत कराव्यात, सर्व सूचना फलक मराठीत असावेत आणि आवश्यक असल्यास इंग्रजीचा दुय्यम वापर करावा, असे समितीचे म्हणणे आहे. तसेच विभाग, काउंटर, आपत्कालीन सेवा व ओपीडीची नावे मराठीत नमूद करून रुग्ण मार्गदर्शन करताना मराठी भाषेला प्राधान्य द्यावे,अशीही मागणी करण्यात आली आहे.

वाद पेटण्याची शक्यता

मिरा भाईंदर शहरात सध्या रिक्षा चालकांना राबवण्यात आलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयावरून संपूर्ण राज्यातील वातावरण पेटून उठले आहे.त्यात आता खासगी रुग्णालयात देखील मराठीला प्राधान्य देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.