भाईंदर :-वर्षभरापूर्वी मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेल्या मिरा रोड येथील ‘जोधपूर स्वीट’ या दुकानाला अखेर टाळे लागले असल्याचा दावा मनसे कडून करण्यात आला आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षामार्फत आनंद व्यक्त केला जात आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात होता. यावेळी मनसेचे पदाधिकारी मिरा रोड येथील ‘जोधपूर स्वीट’ या दुकानात गेले होते. त्यावेळी दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने मोठा वाद उफाळला होता.
त्यामुळे मराठी-अमराठी असा वाद निर्माण झाला.आणि मराठी एकीकरण समिती आणि मनसेने पुकारलेल्या संयुक्त आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मिरा रोड येथे जाहीर सभा घेत मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला होता.
त्यानंतर पुढील काही महिने हे दुकान चर्चेत राहिले. तसेच मनसेकडून याच परिसरात मराठीची हंडी व इतर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. दरम्यान, आता वर्षभरानंतर ‘जोधपूर स्वीट’ हे दुकान बंद झाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. व्यावसायिक तोटा होत असल्याने दुकान बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. तर मराठीचा अपमान केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली, असा दावा स्थानिक मनसे पदाधिकारी संदीप राणे यांनी केला आहे.
तर नेमके कोणत्या कारणामुळे दुकान बंद झाले, किंवा ठेवण्यात आले या संदर्भात दुकान मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.तर दुकान बंद झाले नसून लग्न किंवा अन्य कौटुंबिक कार्यक्रमासाठी काही दिवस बंद असणार आहे, अशी माहिती जवळील काही दुकानदार देत आहेत.
