भाईंदर : मिरा रोड येथील जे. पी. इन्फ्रा मार्गावर रस्त्याच्याकडेला नव्या चारचाकी गाड्या मोठ्या संख्येने उभ्या केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. या वाहनांमुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिरा रोड परिसरातील घोडबंदर मार्गालगत असलेला जे. पी. इन्फ्रा मार्ग हा महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंदीचा प्रस्तावित रस्ता आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या या रस्त्याचे विकासकाम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या या मार्गावर तुलनेने कमी वाहतूक असते.मात्र परिसरातील नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दरम्यान या अपूर्ण रस्त्याचा वापर काही चारचाकी वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरत्या गोदामाप्रमाणे केला जात असल्याचे समोर आले आहे.यामध्ये रस्त्याच्याकडेला एका मागोमाग एक अशा पद्धतीने दहा ते पंधरा नव्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही तैनात करण्यात आले आहे. परिणामी, इतर वाहनांसाठी वाहनतळची जागा उपलब्ध होत नाही. तसेच अवजड वाहने एकाच वेळी आल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

विना नंबर प्लेट गाड्यांमुळे संशय

या मार्गावर उभ्या करण्यात येणाऱ्या बहुतांश गाड्यांवर नोंदणी क्रमांक (नंबर प्लेट) नसल्याचे आढळून आले आहे. उपलब्ध जागेनुसार या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी हलवून उभ्या केल्या जातात. विना क्रमांक गाड्या अधूनमधून रस्त्यावरून हलविल्या जात असल्याने त्या कुठे आणि कशा वापरल्या जातात, याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साडेचार लाखांचा दंड

या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख रुपयांचा दंड संबंधित वाहनधारकांकडून वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.दरम्यान मोठे गोदाम भाड्याने घेऊन वाहने ठेवण्यापेक्षा रस्त्यावर उभी केल्यास खर्च वाचतो असा दावा काही स्थानिकांकडून केला जात आहे. मात्र सार्वजनिक रस्त्याचा अशा प्रकारे वापर करणे कितपत योग्य, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.