भाईंदर : पावसाचे पाणी घरात शिरत असल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादात मिरा रोड येथील पेणकर पाडा परिसरात कोयता बाहेर काढल्याची घटना घडली. मात्र, या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मिरा रोड येथील पेणकर पाडा परिसरात एका इसमाने महिलेवर कोयत्याने हल्ला करून तिच्या डोक्याला जखम केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भररस्त्यात कोयता काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.मात्र, समोर आलेल्या या घटनेचे स्वरूप वेगळे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हा कौटुंबिक वाद असून, घटनेतील दोन्ही पक्ष एकाच भावकीतील आहेत. मुसळधार पावसामुळे एका कुटुंबाकडून घरावर प्लास्टिक टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे शेजारील घरात पावसाचे पाणी जाऊ लागल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यावेळी प्लास्टिक कापण्यासाठी संबंधित व्यक्तीने कोयता हातात घेतला. त्यानंतर दोन्ही बाजूंतील वाद मिटला. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.
घटनेवर आक्षेप
पेणकर पाडा येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यापूर्वीही मिरा रोड परिसरात क्षुल्लक कारणांवरून धारदार शस्त्रांचा वापर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
